🌼 मातोळ्याच्या मातीत जन्मलेला दत्तोबा भोसले हा एक ध्येय वेडा माणूस होता. त्यांचे हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यातील योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्याकाळच्या शिक्षित तरुणांपैकी ते एक लढवैये क्रांतिकारक होते. काळाचे महत्व ओळखून त्यांनी ज्ञाना बरोबरच शरीर संपदा कमावलेली होती. हिप्परग्याच्या शाळेतील संस्काराने त्यांना देशभक्तीने भारले होते. इंग्रजांची गुलामगिरी पत्करलेल्या निजाम राजवटीतील अन्याय व अत्याचाराने अस्वस्थ बनलेले दत्तोबा भोसले स्वामी रामानंद तीर्थ व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रभावाने ते स्वातंत्र्यासाठी प्रेरित होऊन हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यात उतरले होते.
🌼 हैदराबाद मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षपूर्ती निमित्त मरावाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित क्रांतिवीर दत्तोबा भोसले डिफेन्स अकॅडमी देवताळा आयोजित ” मराठवाडा मुक्ती संग्राम व क्रांतिवीर दत्तोबा भोसले यांचे योगदान ” या व्याख्यानमालेच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा अभ्यास करण्याचा योग आला. त्यांच्या कार्याची ओळख समाजापर्यंत पोहोचवण्याची संधी या अकादमीच्या माध्यमातून मिळाली हे आम्ही आमचे परमभाग्य समजतो.
🌼 या व्याख्यानमालेच्या निमित्ताने देवताळा येथे एका कार्यशाळेचे आयोजन विवेक भोसले व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केले होते. त्यावेळी द्त्तूभाऊंचे चिरंजीव मा. विवेक भोसले यांच्या संकल्पनेतून क्रांतिवीर दत्तोबा भोसले त्यांच्या कार्याचा परिचय करून देणारी स्पॅन पब्लिकेशन औरंगाबाद ने प्रकाशित केलेली एक पुस्तिका व एक छोटी स्मरणिका सर्व व्याख्यात्यांना देण्यात आली.
🌼आपल्या वडिलांची कर्तबगारी दुसऱ्याच्या तोंडून ऐकताना विवेक भोसले यांच्यासारख्या संवेदनशील व्यक्तीला ही गोष्ट गौरवासपत्व अभिमानास्पद वाटू लागली. त्यामुळे त्यांनी एक छोटी स्मरणिका काढली. परंतु क्रांतिवीर दत्तोबा भोसले यांच्या कार्याची अधिक ओळख व्हावी व त्यांच्या देशभक्तीचे, समानतेचे आणि आरोग्याचे संस्कार नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने प्रा.अर्जुन जाधव व विजय चव्हाण यांनी तत्कालीन काही व्यक्तींशी चर्चा करून पुस्तकाचे सविस्तर लेखन केले. या पुस्तकाला डॉक्टर जनार्दन वाघमारे (माजी खासदार) यांची प्रस्तावना आणि न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर व डॉ. सूर्यनारायण रणसभे यांच्या शुभेच्छा पर संदेशामुळे तसेच दर्जेदार मुखपृष्ठांमुळे हे पुस्तक क्रांतिवीर दत्तोबा भोसले यांच्या समग्र कार्याचा, विचाराचा व आचाराचा एक ऐतिहासिक दस्तऐवज वाटतो.
🌼 अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून काही स्वयंस्फूर्त व्याख्यान देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींचा एक व्हाट्सअप ग्रुप आमचे मित्र कमलाकर सावंत यांनी तयार केला व 75 गावातून 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या दरम्यान व्याख्यान आयोजित करण्याचे नियोजन या कार्यशाळेत ठरविण्यात आले. त्यानुसार प्रत्येकावर जबाबदारी देऊन ठरलेल्या नियोजनानुसार त्या त्या ठिकाणी सहभागी सर्व व्याख्यात्यांनी सुंदर कार्यक्रम पार पाडले.समाजाकडून व शाळेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
🌼 त्याचाच एक भाग म्हणून माझ्याकडे सात गावातून व्याख्यानाचे नियोजन देण्यात आले होते. त्यानुसार मी चिन्मयानंद स्वामी विद्यालय दर्जी बोरगाव ता. रेणापूर , गणेश विद्यालय छत्रपती चौक लातूर, सरस्वती विद्यालय पेठ ता.लातूर, जि. प. प्रा. शा. चांडेश्वर (न) ता लातूर , जि. प. प्रा. शा. तुंगी ता. औसा तसेच स्वामी दयानंद विद्यालय ता. लातूर आदी ठिकाणी व्याख्यान देण्याचा योग आला. या निमित्ताने संबंधित गावातील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालकांशी संवाद साधता आला. मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील जुन्या आठवणी पुन्हा एकदा अनेकांच्या चर्चेतून ऐकायला मिळाल्या. प्रत्येक ठिकाणच्या घटना सारख्या असल्या तरी प्रसंग मात्र वेगळे असल्याची जाणीव या चर्चेतून झाली.
🌼 दत्तू भाऊंचे कार्य साठ-सत्तर वर्षे उलटूनही लोकांपर्यंत पोहोचली नाही अशी खंत दत्तू भाऊंच्या चिरंजीवांनी लेखकांना बोलून दाखवली, त्यामुळे लेखकानी दत्तू भाऊंच्या हस्तलिखित डायरीवरून आणि गावागावात व घराघरात जाऊन परिश्रमपूर्वक माहितीची संकलन करून दत्तु भाऊंच्या कार्याला व विचाराला एक क्रांतिकारक म्हणून न्याय देण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून केलेला आहे. त्याचा व्याख्यानासाठी आम्हा सर्व व्याख्यात्यांना निश्चितच फायदा झाला.
🌼 हैदराबाद मुक्तिसंग्राम लढा हा राजकीय दृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीचा होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याप्रमाणे या लढ्यातील ऐतिहासिक घटनांची नोंद भारतीय स्वातंत्र्यच्या इतिहासात होणे अपेक्षित होते. मात्र तसे घडले नाही. मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील प्रसंग व घटनांचे खूप कमी लेखन झाल्याचे आढळते.तसा प्रयत्न कमलाकर सावंत यांनी हाती घेतला असून त्यांनी वॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून बरीच माहिती उपलब्ध करून दिली , तसेच प्रत्येकानी आपापल्या परीने व्याख्यानासाठी माहिती संकलित केली. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासनाकडून व समाजाकडून व स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून याबाबत निश्चितपणाने प्रयत्न होताना दिसत आहेत. पुढेही संशोधन होत राहील अशी अपेक्षा बाळगण्यास काही हरकत नाही.
🌼 क्रांतिवीर दत्तोबा भोसले डिफेन्स अकादमीच्या माध्यमातून विविध ठिकाणी जी व्याख्या ने देता आली, त्यात दत्तू भाऊंचे विविध विविध पैलू नव्या पिढीसमोर मांडता आले. दत्तू भाऊनी शिक्षण घेत असताना शिक्षणाबरोबरच आरोग्य व खेळाला महत्त्व देऊन शारीरिक विकास कसा साधला व त्याबरोबरच बौद्धिक विकास कसा केला असे विद्यार्थी दशेतील दत्तोबा विद्यार्थ्यांसमोर मांडले , तसेच उच्च शिक्षणासाठी बडोद्याला महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याकडे गेल्यानंतर तिथे कुस्तीच्या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरील नाव कमविणारे दत्तोबा विद्यार्थ्यांसमोर उभे केले. शिक्षण घेऊन परत आल्यानंतर मातृभूमीच्या रक्षणासाठी मिळालेल्या शिक्षणाचा योग्य उपयोग दत्तूभाऊंनी कसा केला असे क्रांतिवीर दत्तोबा भोसले विद्यार्थ्यासमोर मांडताना त्यांच्या कार्यातील देवताळा एक थरार, सेलू हप्त्याची लूट, नाई चाकूर पोलीस स्टेशनवर हल्ला अशा अनेक प्रसंग व घटना छोट्या कथांच्या माध्यमातून सांगितल्या . एक माणूस म्हणून दत्तोबा कसे होते त्यांनी समाजाबरोबर स्वतःच्या कुटुंबातील मुलांनाही शिक्षणाचे महत्त्व कसे पटवून दिले. स्वतःच्या मुलांना आदर्श नागरिक बनविण्यात त्यांचे कसे मोलाचे योगदान होते अशी एक आदर्श ‘ बाप ‘ म्हणून दत्त भाऊंची ओळख या व्याख्यानतुन करून दिली.
🌼 या निमित्ताने माझ्यासारख्या एका छोट्या व्यक्तीला हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यातील क्रांतिकारकांच्या ऐतिहासिक घटना जाणून घेऊन त्याचा अभ्यास करता आला. भारतीय स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात हैदराबाद मुक्ती संग्रामचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. दत्तोबा भोसले यांच्यासारख्या अनेक क्रांतिकारकांच्या कार्याला स्थानिक इतिहास लेखनात स्थान देण्याचे काम या अकादमीच्या माध्यमातून पुढील काळात होत राहिल तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम लढयातील क्रांतिकारकांच्या कथा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी या अकादमीने शासन स्तरावर प्रयत्न करण्यासाठी भविष्यात पुढाकार घ्यावा.
🌼 या व्याख्यानांच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यातील घटना व प्रसंगाला उजाळा देण्याचे काम केल्या बद्दल या अकादमीच्या संचालकांना दयावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. पुन्हा असा योगायोग निर्माण करण्यासाठी या अकादमीला शुभेच्छा…! क्रांतिवीरांना शतदा प्रणाम… !! धन्यवाद…!!! 🌸🌸🌸
🌼 ब्रिजलाल कदम पाटील ( सचिव, जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद, लातूर ) विश्वेश्वरय्या सो. रिंगरोड लातूर. मो. नं. 75 886 11 554 🌹🙏🌹