पोवाडा
आधी नमन भारतभूमीला |
मातृभूमीला |
माय मातीला |
हिच्या स्वातंत्र्यासाठी खास |
स्वातंत्र्यवीरांनी घेतला ध्यास |
निर्मिला शौर्याचा इतिहास | जी जी जी
मराठवाडा भूमी पावन ।
संतांची खाण।
असे महान |
मराठी संस्कृतीची जननी।
नररत्नांच्या अशा खाणी |
माय मराठीची केली पेरणी | जी
मराठी संस्कृतीचा इतिहास ।
भाषा साहित्यास ।
अमृतवचनास |
जन्म दिला मराठवाड्याने ।
गातो आम्ही इथे पोवाड्याने ।
ऐकावे तुम्ही आवडीने |
मराठवाड्या नजर लागली | कुणा चांडाळाची |
पापी मंडळाची |
आली गुलामी नशिबाला |
लेक परागंदा माहेरला |
नसे कुणी वाली तारण्याला |
चाल:-
माय मराठी आपुल्याच घरी झाली जेरबंद |
संस्कृतीला ग्रहण लागले केले चिरेबंद |
यादवांचे राज्य बुडाले यवन झाला सैतान |
देवगिरी अजिंक्य पडला झुकली खाली मान |
हैदराबादचा निजाम झाला असे शिरजोर |
हैदराबाद संस्थेने केली जनता बेजार |
जगातली प्रदीर्घ ही सत्ता
उलथवील कोण ?
इंग्रजांचे अभय मिळाले लागला ऊरी बाण |
जर्जर झाली जनता सारी चालेना काही उपाय |
आभाळ हे फाटले आमचे दे धरणी दे ठाय |
चाल:-
पेरला मुक्तिसंग्राम ।
जागले ग्राम ।
लागले काम ।
आंदोलन उभे ठाकण्याचे। दिवस संपले घोकण्याचे |
शत्रूच्या पुढे झुकण्याचे | जीजी
स्वामी रामानंद तीर्थांनी ।
खर्या अर्थांनी ।
उभारतांनी |
आंदोलनात ओतली जान ।
जमविले थोर स्त्रिया जवान |
साधले तलवार तीर कमान | जी
स्वातंत्र्याचे पेटली रण ।
उजळले मन ।
श्रमले तन |
तळपला त्यात एक हिरा ।
दत्तोबा शोभे वीर खरा |
भोसले कुळाचा चमकता तारा | जी
दत्तोबांचा पिंड कुस्तीचा।
गडी मस्तीचा।
शेती वस्तीचा |
गुणी विद्यार्थी होता हुश्शार।
स्वामींचा शिष्य मोठा तय्यार ।
मातोळा गावचा केला उद्धार | जी
औसा तालुका लातूर जिल्ह्यात।
मातोळा गावात।
शेतकरी घरात |
19 नोव्हेंबर रोजी ।
साल 1918 मंदी ।
मातोश्री लक्ष्मीबाई पोटी |
दत्तोबा रूपी भरली ओटी | जीजी
राष्ट्रीय शाळा हिप्परगा ।
संस्कारी जागा ।
क्रांतीचा धागा ।
इथेच जागे राष्ट्रभक्ती ।
लाभे शिक्षक थोर व्यक्ती ।
स्वातंत्र्य वीरा मिळे युक्ती | जी रं जी जी
( याच शाळेत स्वामी रामानंद तीर्थ मुख्याध्यापक होते ,दत्तोबा भोसले यांच्या कौशल्य गुणांमुळे ते म्हणाले होते की, ‘हा दत्तोबा भविष्यात पराक्रमी निघेल’ )
स्वामींचे शब्द खरे ठरले ।
दत्तोबा भोसले ।
रणी उतरले।
चिंचोली कॅम्पचे नेतृत्व |
गौडगाव कॅम्प शिस्तबद्ध ।
रझाकार पुंड केले फस्त |
धानोर्यात दरारा केला ।
पैलवान होते संगतीला।
स्वातंत्र्य सैनिकी हल्ला ।
मोठा परिवार पाडीला
समाजवादी विचारसरणी ।
शक्तीची केली पेरणी |
युक्तीची होती फोडणी ।
देशभक्तीची ही धाटणी |
क्रांतिसिंह नाना पाटलांना।
बोलावून मोठ्या सभांना |
मारीन किंवा मरेन ।
हा दत्तोबांचा बाणा |
रझाकारी जुलूम चाले।
चिलवडी गाव जाळले ।
त्याचा सूड घेण्याचे ठरले।
रझाकारी बहू उडवले |
निजाम दुर लोटले।
जनतेचे रक्षण केले ।
चिंचोली कॅम्प मधले ।
पासष्ट गावे मुक्त केले |
पासष्ट गावांचे राज्य ।
नाव मुक्तापूर स्वराज्य !
मराठवाड्यात प्रतीसरकार।
प्रमुख दत्तोबा मातोळकर |
दत्तोबांचे सैनिक भारी ।
जनतेला देई उभारी ।
नेतृत्व सरहद्दीवरी ।
कलेक्टर हैदर वर्णन करी ।
जवळे दुमला येथील कॅम्प।
रझाकारा सुटला कंप ।
निझामा लागली धाप ।
असा क्रांतीचा हा भूकंप |
उपळे गावाचे धन।
व्यापाऱ्यांचे केले रक्षण ।
सोडगे दल केले निर्माण।
क्रांती वीराचे शूर सैन्य ।
काजळा गावचा हल्ला।
मोठ्या शौर्याने परतवीला ।
सेलूच्या हप्त्यावर डल्ला।
म्हणून तुरुंगवास भोगला।
आळणी गावचे केले रक्षण ।
नाईचाकूर लुटले स्टेशन |
हल्ल्याचा सूत्रधार कोण?
बघा ‘ऑक्टोबर कुप ‘ वाचून
चळवळीत पुढे किल्लारी।
खरडा , ईट, घाट पिंपरी |
काटी गाव असे ते भारी ।
धाबे दणाणले सरकारी |
चाल:-
हैदराबाद मुक्तिसंग्राम
केला गतिमान |
सोलापूर जिल्ह्यात आश्रय नीति बुद्धिमान |
देवतळे मध्ये रझाकाराला दावी आस्मान |
गनिमीकाव्याने ठरवून केले जिवाचे रान |
चाल:-
क्रांतिवीर दत्तोबा भोसले।
वीर पोसले ।
काळ भासले |
निजामाची केली सुट्टी।
स्वातंत्र्यसैनिकांशी गट्टी।
गडी हाडाचे मरहट्टी | रं जी
मातोळा गावचा वीर ।
शूर नरवीर |
अति खंबीर |
केला कुळाचा असा उद्धार |
स्वातंत्र्य मिळवण्याचा निर्धार |
दत्तोबा वीर शोभे भरदार | जी
मराठवाड्या मिळाले स्वातंत्र्य ।
जळले पारतंत्र्य |
निझामी षडयंत्र |
करा त्या विरांचा जयजयकार |
स्मरा त्या वीरांचे उपकार |
मुजरा शाहिरांचा त्यांना त्रिवार |
गायक व संगीत- प्रा डॉ तुकाराम वांढरे
गीतकार *शाहीर समाधान इंगळे