प्रस्तावानाः

हैद्राबाद मुक्तीसंग्राम हा भारतीय स्वातंत्र्य्याच्या पुर्णत्वाचा इतिहास आहे पण दुर्दैवाने त्याचा व त्यातल्या त्यात सशस्त्र लढ्याच्या योगदानाबद्दल अनभिज्ञता आहे. सशस्त्र लढा उभा राहीला नसता तर गावे व गावकरी जनता सुरक्षित राहु शकली नसती. रजाकाराचा खंबीर मुकाबला सरहद्दीच्या कॅम्पमधील स्वातंत्र्य सैनीकानी जीवावर उदार होऊन केला व अश्या सशस्त्र लढ्याचे सेनानी होते क्रांतीवीर दत्तोबा भोसले ज्यांच्या कथा जात्याच्या पाळूपासून ते पारावर व चावडीचावडीपर्यत सांगितल्या जातात. ज्यांना पकडण्यासाठी निझामाने मोठे बक्षिस ठेवले होते. अनेक सापळे रचले गेले पण ते सापडले नाहीत. वेशांतर करण्यापासून ते पांढऱ्या घोडीवर वाऱ्यासारखे धावणारे, सशस्त्र तरूणांची फौज उभी करणारे दत्तोबा भोसले एक अख्यायिका बनले आहेत.

या लढ्याला शिक्षणाचीही किनार आहे. दत्तोबा भोसले म्हणजे लोहाऱ्या जवळच्या हिप्परगा गावातील स्वामी रामानंद तिर्थ मुख्याध्यापक असलेल्या राष्ट्रीय शाळेचे विद्यार्थी. शिक्षणाच्या प्रचंड आवडीतून त्यांना राष्ट्रवादाचे धडे मिळाले. पुढे दत्तोबा ज्ञानर्जनासाठी हरीभाऊ देवकरण हायस्कुल येथे मॅट्रीकचे शिक्षण पुर्ण करुन सयाजीराव गायवाडांच्या आश्रयाला बडोद्याला गेले. तिथे माणीकराव आखाड्याच्या तालमीत आत्मविश्वास घेवून इंटर पर्यंत शिक्षण पुर्ण करत करत नॅशनल रेसलींग चॅम्पीयन झाले.

रझाकाराच्या अत्याचाराच्या बातम्या कानावर पडल्यावर ते शिक्षण सोडुन गावाकडे येऊन तरुणांची जमवाजमव करुन कॅम्प उभे कैले. ओठावर क्रांतीचा जयजयकार, त्यांच्या आवाजातली जरब अन् डोळ्यातल्या तेजाने रझाकार थरथरा कापत असत. नाईचाकूर पोलिस स्टेशनवर हमला करुन शस्त्राश्त्राची लुट, सेलु हप्ता लुट व देवताळ्यात कित्येक रझाकारांचा खात्मा करुन प्रेताने विहीरी खचाखच भरल्या तसेच तळे रजाकाराच्या रक्ताने लाल झाले अशा कितीतरी रक्तरंजित संघर्षाने क्रांतिवीर दत्तोबा भोसले यांचा लढा जनमाणसाच्या हृदयात कोरलेला आहे. तत्कालीन निजाम कलेक्टर महंमद गौस हैदरच्या ‘ ऑक्टोबर कूप’ या आत्मचरित्रात दत्तोबा भोसले यांचा “Matola Devil on horseback” असा त्यांनी उल्लेख केला आहे. त्यांच्या भरधाव पळण्याची तर एवढी ख्याती होती की कीत्येक जीप पाठीमागे पाठलाग करत असतांना ते त्यांना गाठू शकत नव्हते.
कुस्ती व्यायामाची प्रचंड आवड असतानाही, वाचन, डायरी लिहिणे, शिक्षणाचे महत्व ते ओळखून होते. कारागृहात त्यांनी लिहिलेल्या रोजनिशीतले लेख त्यांच्या राष्ट्रवादाचे देशभक्तीचे अन् गुलामगिरीविरूध्द व विषमतेविरूध्द त्यांचा कल स्पष्ट करणारे आहेत.

मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझे कै दत्तोबा भोसले यांचे बरोबर १९६० पासुन घनिष्ट संबंध होते आणी त्यांच्या धाडसाच्या व शौर्याच्या कहाण्या गावोगाव ऐकल्या व अनुभवल्या आहेत. सर्व मुला मुलींची नावे बंगाली ठेवले जे त्यांच्या क्रांतीकारी व पुरोगामी विचाराचे द्योतक आहे. त्यांनी शिक्षणाचे महत्व ओळखुन मुला मुलींना दुर औरंगाबादला ज्ञानार्जनासाठी पाठवले व त्या दुरदृष्टीपणाचे परीणाम दिसतोच की आज त्यांच्या पुढच्या पिढी वेगवेगळ्या क्षेत्रात चौफेर प्रगती करत आहेत. निजामाच्या काळ्याकुट्ट अंधाराला भेदण्याची छाती या मातीत निर्माण होऊ शकते तर या मातीतून निडर मने तयार होऊ शकतात म्हणुन हैद्राबाद मुक्ती संग्रामाचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना मराठवाड्याच्या हा इतिहास हा येणार्या पिढीला स्फुर्तीदायक व मार्गदर्शक राहील असे मला ठामपणे वाटते.

ॲड शशीकुमार चौधरी
जेष्ठ विधीज्ञ, छत्रपती संभाजी नगर.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top