लहानपणी ‘महाराष्ट्र टाईम्स’मध्ये एक लेख आला होता. त्यामध्ये आमच्या गावाची दोन नावे दिली होती. शिंदे चिंचोली आणि कँप चिंचोली. गावात बहुतांश लोकांचे म्हणजे ९५ टक्के लोकांचे आडनाव शिंदे असल्याने, शिंदे चिंचोली हे नाव आले असावे, हे बालवयातही लक्षात आले. मात्र कँप चिंचोली या नावाचे गुढ तसेच राहिले. कँप चिंचोली नावाबाबत सुट्टीत गावी आल्यानंतर वडिलांना विचारले. त्यांनी रझाकार, निजाम त्यांचे अत्याचार आणि त्याविरूद्ध लढणारे सैनिक याबाबत बरीच माहिती दिली. निजाम, रझाकाराविरूद्ध लढणाऱ्या सैनिकांचा कँप चिंचोली येथे होता, त्यामुळे गावाची ओळख कँप चिंचोली असल्याचे सांगितले. हा संदर्भ वगळता इतर सर्व तपशील, बरीचशी माहिती विस्मरणात गेली. पुढे शिक्षण, नोकरीच्या व्यापात हा विषय बाजूला पडला. एक दिवस मराठीचे ज्येष्ठ समिक्षक प्रा. रणधीर शिंदे यांनी या विषयावर साठलेली धूळ बाजूला केली. मी माझ्या गावाबाबत लिहावे, असा आग्रह धरला. विज्ञानाचा विद्यार्थी असल्याने केवळ ऐकीव माहितीवर लेखन करायला मन तयार होत नव्हते. म्हणून काही वर्षांपासून मी गावाचा इतिहास शोधत आहे. त्यातून उस्मानाबाद जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी महमंद हैदर यांचे ‘ऑक्टोबर कुप’ नावाचे आत्मचरित्र हाती आले. त्यामध्ये चिंचोली गावाचा उल्लेख आलेला प्रथम सापडला. आणखी काही संदर्भांतून काही दिवस का होईना चिंचोली गाव ‘मुक्तापूर स्वराज्य सरकार’ची राजधानी होते, हे समजले. अजूनही गावाचा इतिहास शोधतो आहे. या शोधयात्रेत मी रेंगाळलो ते दत्तोबा भोसले या स्वातंत्र्य सैनिकाजवळ!
चिंचोली गावाला राजधानीचा दर्जा देण्यात आणि टिकवून ठेवण्यात दत्तोबा भोसले यांचे कार्यकर्तृत्व मोठे. त्यांनी गाजवलेला पराक्रम आणि निजाम प्रशासनात निर्माण केलेली दहशत फार मोठी होती. तरीही स्वातंत्र्याच्या इतिहासातच नाही, तर मराठवाडा मुक्तीसंग्रामातही हे नाव फारसे आढळत नाही. दत्तोबांचा निजामशाहीशी लढा, त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च बिंदू असला, तरी ते त्यापूर्वी आणि नंतर आदर्श विद्यार्थी आणि सुजाण नागरिक बनून जगले. त्यांचे त्या काळातील विचार मनाला भारावून टाकणारे आणि त्यांच्या प्रतिभेची साक्ष देणारे आहेत आणि त्यांचे आचरणही तसेच राहिले. त्यामुळेच त्यांच्याविषयी आकर्षण निर्माण झाले आणि गावापेक्षा दत्तोबांच्या शोधात गुंतलो.
ईश्वरराव लिंबाजी भोसले हे मातोळा (ता. औसा जि. लातूर) येथे शेती करत. त्यांचे दोन विवाह झाले होते. त्यातील लक्ष्मीबाई यांच्यापोटी दोन बहिणींच्यानंतर दत्तोबा उर्फ दत्तात्रय यांचा १९ नोव्हेंबर १९१८ रोजी जन्म झाला. दत्तोबांना योग्य वयात गावातील शाळेत घालण्यात आले. भारताचा बाकी भाग इंग्रजांच्या ताब्यात होता, तर या भागात त्यावेळी निजामाची संस्थानी राजवट होती. इतर भागात मातृभाषेतून शिक्षण घेता येत असले, तरी निजामाच्या राज्यात तिसरीच्या पुढे ऊर्दूतून शिक्षण घ्यावे लागत असे. दत्तोबांचे प्राथमिक शिक्षण संपताच ते १५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हिप्परग्याच्या राष्ट्रीय शाळेत आले. गावापासून हिप्परग्याला ते चालत जात असत. पिळदार देहयष्टी, क्रीडा आणि अभ्यासातील नैपुण्याने त्यांनी तेथील शिक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्यावेळी स्वामी रामानंद तीर्थ हे त्या शाळेचे संस्थापक – मुख्याध्यापक होते. राष्ट्रीय विचाराने प्रेरीत विद्यार्थी घडावेत या हेतुनेच या शाळेची स्थापना करण्यात आली होती. ते या शाळेचे विद्यार्थी असताना वि.स. खांडेकर यांनी १९३५ मध्ये या शाळेस भेट दिली होती. कदाचित तेथून ते खांडेकर यांच्या लेखनाच्या प्रभावाखाली आले असावेत.
निजाम संस्थानातील शाळेत त्यांना शिक्षण घ्यावयाचे नव्हते. त्यामुळे त्यांनी सोलापूरच्या हरिभाई देवकरण प्रशालेत प्रवेश घेतला आणि तेथून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यावेळी त्यांना शिक्षकाची किंवा शासकीय नोकरी सहज मिळू शकली असती. मात्र दत्तोबांना पुढे शिकायचे होते. पुढील शिक्षणासाठी त्यांनी थेट बडोदा गाठले. हिप्परग्याच्या शाळेतील मुलांना पुढे शिकायचे असेल तर बडोदा येथे जाण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत असे. ते बडोद्याला शिक्षण घेत असताना त्यांची देहयष्टी आणि क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य पाहून प्रा. राजरत्न माणिकराव (त्यांचे मूळ नाव गजानन ताम्हणकर. राजरत्न माणिकराव ही महाराजानी त्यांना दिलेली उपाधी.) यांनी त्यांना ‘तुम्ही हिप्परग्याच्या शाळेतून आलास का?’ असे विचारले. दत्तोबांना राजरत्न यांनी आपल्या आखाड्यातच ठेवून घेतले. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड स्वातंत्र्याची आस असलेले अशा युवकांना पूर्ण अर्थसहाय्य करत. दत्तोबा त्यांचे आवडते विद्यार्थी बनले. तालमीत कसून मेहनत करून घेण्यात येत होती. हजार जोर आणि दोन हजार बैठका करवून घेण्यात येत. अर्थातच कसून मेहनतीच्या जोरावर दत्तोबा मिडलवेट गटात राष्ट्रीय विजेते बनले. महाराज सयाजीराव यांचे दत्तोबा इतके आवडते बनले की त्यांनी राजचित्रकार घोरपडे यांच्याकडून दत्तोबांचे चित्र काढून घेतले आणि आपल्या संग्रही ठेवले. त्यांचे शिक्षण पूर्ण होत आले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देशभरात कोठेही त्यांची प्रथम श्रेणी आधिकारी म्हणून नियुक्ती झाली असती!
त्याचवेळी मराठवाड्यात, निजामाच्या राज्यात सर्वत्र असंतोषाचे वारे वेगाने वाहत होते. निजामाच्या राज्यात तिहेरी अंमल सुरू होता. इंग्रजाचे राज्य अखंड भारतावर होते. निजामाच्या राज्याचाही त्यात समावेश होता. निजाम संस्थानिक होता. त्याला मर्यादित स्वातंत्र्य मिळाले होते. त्यामुळे इंग्रजाची प्रथम आणि मर्यादित अंकुश होता. निजामाचे थेट राज्य आणि अंकुश होता. निजामाच्या पोलीस दलाची हुकमत होती. महसूल गोळा करण्यापासून संरक्षणापर्यंत सर्व बाबी निजामाच्या हाती होत्या. दुसऱ्या महायुद्धानंतर भारताला स्वातंत्र्य मिळण्याची चिन्हे दिसू लागताच मूळात धर्मांध आणि क्रूर असणाऱ्या निजामांने आपले वागणे कठारे बनवले. त्यातून ८५ टक्के हिंदूना पिटाहण्याची किंवा त्यांचे धर्मांतर करायची, इच्छा व्यक्त करू लागला. स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैद्राबाद राज्य काँग्रेसची स्थापना केली. मात्र लगेच निजामाने बंदी घातली. अशा निजामाची दुसरी हुकमत. त्याने आपले राज्य कब्जात राहावे. स्वतंत्र होऊ नये, म्हणून लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी रझाकार संघटनेसारख्या संघटनांना पाठबळ दिले. लातूरमध्ये वकिली करणाऱ्या कासीम रझवी याने निजामाला पाठिंबा देण्यासाठी रझाकार ही संघटना निर्माण केली होती. सर्वत्र हैदोस घालणाऱ्या या रझाकारांची तिसरी हुकमत. मात्र निजामी सत्तेचे पोलीस आणि रझाकार यांनी जनतेला सळो की पळो करून सोडले होते. महिलांच्या इज्जतीला हात घालणे आणि संपत्तीची लूट करणे हे नित्याचे झाले. हे सारे दत्तोबांना कळत होते. याचा अतिरेक झाला आणि दत्तोबा यांनी महाराजांकडे मातृभूमीची, तेथील जनतेची या अत्याचारातून सुटका करण्यासाठी जाऊ देण्याची विनंती केली. महाराजांनी त्यांना परवानगी तर दिलीच, पण पुढे हरप्रकारे मदतही केली. दत्तोबा तेथून मातोळ्याला आले. काही दिवसानंतर त्यांनी सातारला कूच केले.
त्यावेळी सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारचा सर्वत्र बोलबाला होता. तशाच प्रकारचे कार्य करण्याची प्रेरणा आणि मार्गदर्शन घेऊन ते परतले आणि निजामाविरूद्ध लढणाऱ्या कँपमध्ये सहभागी झाले. त्यांचे कर्तृत्व लोकांच्या नजरेत भरले आणि प्रमुख लढवय्या अशी त्यांची ख्याती या भागात पसरली. क्रांतीसिंह नाना पाटील, जी.डी. बापू लाड यांनीही या भागाला भेटी देऊन मार्गदर्शन केल्याच्या नोंदी मिळतात. कुंडल येथील प्रतिसरकार जसे होते तसेच निजामाच्या तावडीतून मुक्त केलेल्या ६५ गावांचे त्यांनी मुक्तीपूर स्वराज्य स्थापन केले. त्याची राजधानी किंवा प्रमुख ठिकाण म्हणून हालचालीसाठी सोईचे; पण शत्रूला येण्यासाठी अडचणीचे असणारे चिंचोली गाव त्यांनी निवडले असावे. येथे एकूण सातशे सैनिकांचा कँप होता. त्यांनी जवळा, गौडगाव, तडवळे, गौर, वाघोली, मोहा, खामसवाडी, धानोरा इत्यादी गावात कँपची निर्मिती केली किंवा कँपमधील कारवायांना गती दिली. धानोऱ्यात रझाकारांचा म्होरक्या गुंडू पाशा याची हत्या, अपसिंगा हल्ला, सेलूच्या खजिन्याची लूट, नाईचाकूर पोलिस स्टेशनवरील हल्ला, देवताळ्यात दीडशे रझाकारांचा खात्मा अशा अनेक पराक्रमी घटनांत दत्तोबांचे शौर्य दिसून येते.
उस्मानाबादचे तत्कालीन जिल्हाधिकारी महमंद हैदर यांनी दत्तोबांचे ‘मातोळा डेव्हील ऑन हॉर्सबॅक’ असे वर्णन केले आहे. दत्तोबा पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन येत आणि क्षणात नजरेसमोरून पसार होत. त्यांनी या हैदरच्या गाडीवर बाँब फेकला होता. हैदर यांना त्या भागात सळो की पळो करून सोडले होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तेरा महिन्यांनी मराठवाडा ‘हैद्राबाद पोलिस ॲक्शन’च्या कारवाईनंतर भारतात सामील झाला आणि सर्वच स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनातील दुसरे पर्व सुरू झाले. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच मराठवाडा मुक्ती संग्रामात कार्यरत असणाऱ्या या योद्ध्यांची ओढ शेतकरी कामगार पक्षाकडे होती. मात्र डावी विचारसरणी असूनही घरात सत्यनारायण घालणाऱ्या पुढाऱ्यासोबत काम करणे शक्य नाही, हे ओळखून दत्तोबांनी शेकापपासून फारकत घेतली. नंतरच्या निवडणुकीत ते अपक्ष म्हणून उभे राहिले. मात्र अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या या लढवय्याला त्याच्या काळाच्या पुढे असणाऱ्या विचारांमुळे पराभूत व्हावे लागले. ते पंचायत समितीच्या निवडणुकीलाही उभा राहिले आणि पडले. त्यानंतर त्यांनी राजकारणाचा नाद सोडून घराच्या आणि गावाच्या विकासावर केंद्रित केले. १९५२ साली त्यांनी विवाह केला. विवाहात कोणताही मोठेपणा नव्हता. अत्यंत साधेपणाने विवाह पार पडला. समरप्रसंगी सहाय्य करणाऱ्या कुटुंबातील मुलगीच पत्नी म्हणून निवडली. त्यांच्यावर बंगालच्या क्रांतीकारकांचा, आझाद हिंद सेनेचा आणि त्यांच्या कार्याचा मोठा प्रभाव असावा. युद्ध काळात ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याप्रमाणे वेश परिधान करत. त्यांनी आपल्या सर्व मुलांची नावे बंगाली पद्धतीची विवेकानंद, अरविंद, सच्चिदानंद, तन्मयानंद, निर्मला, कुमुदिनी, कादंबरी, तनुजा अशी ठेवली. याखेरीज छ. शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, शाहू महाराज, क्रांतीसिंह नाना पाटील, नेपोलियन बोनापार्ट, चे गवेरा, यांचाही प्रभाव होता. शिक्षण घेत असताना त्यांनी भरपूर साहित्य वाचले असावे. त्यांच्यावर अनेक इंग्रजी साहित्यिकांचाही प्रभाव होता. वर्डस्वर्थच्या कविता तोंडपाठ होत्या. राजकारणापासून दूर गेल्यानंतर त्यांनी मुले, कुटुंब आणि ग्रामविकासावर लक्ष केंद्रीत केले. त्यांचे दिनांक २ जानेवारी १९७४ रोजी निधन झाले.
शिक्षणातून आणि चिंतनातून दत्तोबांचा दृष्टिकोन विशाल आणि विवेकी बनला होता. त्यांना पहिले अपत्य कन्यारत्नाच्या रूपात प्राप्त झाले. आजही भारतातील अनेक राज्यांत दर हजारी मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण कमी आहे. तसेच अनेक कळ्या जन्मापूर्वीच खुडल्या जात असल्याच्या बातम्या येतात. या पार्श्वभूमीवर दत्तोबांनी १९५२ मध्ये केलेली नोंद खूप महत्त्वाची वाटते. ‘त्याच रोजीं पिढा नाहीशी झाली. सुदैवानं मुलगी झाली व आनंदी आनंद झाला’ अशी नोंद दत्तोबा करतात. मुलीच्या जन्माबद्दल १९५२ मध्ये आनंद व्यक्त करणारे दत्तोबा त्यामुळेच वेगळे आणि महत्त्वाचे ठरतात. दत्तोबांना स्त्री-पुरूष विषमता मान्य नव्हती. समाजातील जात, धर्म, पंथ, भाषा भेदामुळे येणारी विषमता त्यांना मान्य नव्हती. स्त्री-पुरूष भेदाभेदावरून त्यांनी ‘समाजात सर्वत्र विषमता असताना स्त्री-पुरूषातच तेवढी समता कुठून येणार?’ असा थेट प्रश्न विचारतात. ते पुढे लिहितात, ‘आडातच नाही तर पोहोऱ्यात कोठून येणार? निर्दयी रूढीच्या बंदिस्त तुरूंगातच समाजाचे शरीर कुजत आहे, आत्मा गंजत आहे.’ देवताळा येथे दीडशे रझाकारांना उभे कापून काढतानाही त्यांच्या कुटुंबियांना दत्तोबांनी सुखरूप आणि सन्मानाने त्यांच्या मूळ गावी पाठवले. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा जसा त्यांनी घेतला, तसाच महिला आणि मुलांविषयी सहृदयी दृष्टिकोनही घेतला असल्याचे दिसून येते.
त्यांचा भूताखेतावर, अंधश्रद्धावर विश्वास नव्हता. भावकीतील श्रीपतराव भोसले नावाच्या भावकीतील व्यक्तीने आत्महत्या केली. दत्तोबांनी आडनाव भोसले असूनही आत्महत्या केल्याबद्दल त्याला दुषणे दिली. नंतर मोठ्या मुलाला म्हणजे विवेकानंद याला घेऊन त्या ठिकाणाकडे निघाले. त्यावेळी पत्नीने विरोध केला. प्रेत पाहून मूल घाबरेल असे पत्नीचे म्हणणे होते. त्यावर दत्तोबांनी आपण त्याची भिती घालवण्यासाठीच घेऊन जात आहोत असे सांगितले. एवढेच नाही तर तेथे गेल्यावर प्रेताला आवर्जून स्पर्श करायला लावला. प्रेताच्या मुठी सोडवण्याचे काम सांगितले. आपोआप मुलाच्या मनातील भूताखेताची, जादू-टोण्याची भिती दूर झाली. महात्मा फुले यांच्या ‘शंभर व्याख्यानांपेक्षा, एक कृती श्रेष्ठ’ या वचनाचा ते नेहमी उल्लेख करत. या वचनानुसारच त्यांचे वर्तनही होते. ते अनेक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जात, तेथील मंदिरे पाहात, बांधकामाचे निरीक्षण करत. मात्र मंदिरात जाऊन मूर्तीपुढे हात जोडत नसत. याचे कारण सांगताना ते म्हणत, ‘तीर्थाच्या ठिकाणी धोंडा आणि पाणीच असते, खरा देव माणसात असतो, आणि हे मी नाही तुकाराम महाराज सांगतात. ते म्हणतात, तिर्थी धोंडा पाणी l देंव रोकडा सज्जनी ll’
दत्तोबांचे विचार काळाच्या फार पुढे होते. ते विचाराप्रमाणे आचारही ठेवत. जात-धर्मभेद त्यांना मान्य नव्हता. एकदा जवळे दुमाला येथे पाहुण्यांच्या घरी गेले होते. तेथे एक भिकारीण भिक्षा मागण्यासाठी आली. त्यांनी तिच्याशी संवाद सुरू केला. घरात बसायला लावले. तिचा विश्वास संपादन करून तिच्या झोळीतील एक करंजी उचलून खाल्ली. यजमान गृहिणिने त्या बाईला दोन ताजी धपाटी, लाडू आणि करंज्या दिल्या. दत्तोबाच्या करंजी खाण्याच्या कृतीने त्या बाईच्या चेहऱ्यावर आनंद आणि आश्चर्य ओसंडून वाहत होते. दत्तोबा केवळ हसले आणि म्हणले ‘खरा देव इथे आहे’. त्या बाईची जात कोणती? धर्म कोणता? याच्याशी त्यांना काही देणेघेणे नव्हते. त्यांच्या दृष्टीने ‘मानव हाच खरा धर्म’ आणि या नात्यांने ते समस्त मानव जातीशी जोडले जात होते. गावात ज्यांना अस्पृश्य म्हणून वेगळी वागणूक दिली जात असे, त्या समाजातील लोकांना बोलावून ते त्यांच्यासमवेत जेवायला बसत. स्वत:च्या हातांनी ताक-भाकरी कुस्करून देत. आपल्या रोजनिशीतील एका पानावर ते लिहितात, ‘जगातील श्रमणारे किसान-कामगारांची भूक शांत होईल, तेव्हाच जगात शांतता निर्माण होईल’.
इतरांच्या श्रद्धेबद्दल ते अडथळा बनले नाहीत. शिवभक्त पत्नीला घराच्याबाहेर महादेवाचे मंदिर बांधून दिले आणि ‘तिथे तूझी पुजा कर, मात्र घरात पूजा नको’, असा आग्रह धरला. पत्नीनेही तो नियम पाळला. यातून ते इतरांच्या मनाचा, भावनांचा आणि श्रद्धेचा आदर करत, हेच दिसून येते. ते स्वत: पूर्णत: नास्तिक नव्हते. त्यांच्यासाठी देव होता, पण तो सज्जनांमध्ये पाहात असत. त्यांच्या दृष्टीने देवळात जाऊन देव भेटत नाही. दीनदुबळ्यांची सेवा केल्यास त्याच्या चेहऱ्यावरच्या आनंदातून देवाचे दर्शन होते. लोक कर्ज काढून देव-देव करत बसतात, हे त्यांना पटत नव्हते. रोजनिशीत यासंर्भात केलेली नोंद त्यांचे विचार स्पष्ट करते. ते लिहितात, ‘पंढरीच्या आषाढी कार्तिकेच्या यात्रांना हजारो वारकरी दरवर्षी जातात. अगदी कर्ज काढून जातात. त्या कर्जाचे जब्बर व्याज भरण्याचा प्रसंग येतो तेव्हा दामाजी पंतासाठी विठू महार होवून भल्या मोठ्या रकमेची भरपाई करणारा विठ्ठल एकाच्याही मदतीला धावून येत नाही! देवभक्ती हा एक दुबळ्या मनाचा दु:ख विसरण्याचा मार्ग आहे. पण कुठलीही दु:खे विसरून दूर होत नाहीत, ती झगडून प्रसंगी लढून दूर करावी लागतात.’ ‘दे रे हरी, खाटल्यावरी’ असे तर नाहीच. तुम्ही भक्ती केली तरी देव एखाद्या दामाजीच्याच उपयोगाला येतो, सर्वांच्या नाही. ते एवढे सांगून थांबत नाहीत, तर आपल्या दु:खाचे निरसन करण्यासाठी स्वत:च प्रयत्न करायला हवेत, असेही सांगतात. आणखी एका नोंदीमध्ये ते म्हणतात, ‘जगात एकदम यश कोणाला मिळाले आहे. आजच्या अपयशातून भावी यश फुलेल. अशा अनुभवातूनच जग पुढें जात असते.’ बुवाबाजीवरही त्यांनी सडकून टिका केलेल्या नोंदी आढळून येतात. त्यांनी घरात सत्यनारायणाची पूजाच नव्हे; तर कसलीच पूजा केली नाही.
आजही टिटवी ओरडली की माणसाच्या मनात काहूर उठते. अविचाराने मनात थैमान सुरू होते. जवळच्या कोणाच्यातरी जाण्याची शंका यायला लागते. दत्तोबाना टिटवीचे ओरडणे हा तिचा निसर्गधर्म वाटतो. त्यात शुभाशुभ काहीच नसते. आणखी एका ठिकाणी ते म्हणतात, ‘प्रत्येक रूढी काही कारणाने उत्पन्न होते. पण ते कारण नाहीसे झाल्यावर ती कायम ठेवणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे. देवाच्या भंगून गेलेल्या मूर्तीची कुणी पूजा करत नाही.’ हे विधान करताना ते देवावर विश्वास ठेवायला सांगत नाहीत, तर त्याचा उपयोग एक दृष्टांत म्हणून करतात.
देवाधर्मावर खर्च करण्यापेक्षा स्वत:च्या शरीराकडे लक्ष द्या, असे दत्तोबांचे म्हणणे होते. ‘शरीर सुंदर व पुष्ट असावे, हाच खरा धर्म आहे. शरीर जर चांगले डौलदार, पीळदार असेल तर तो माणूस जगात राजा आहे; भाग्यवान तोच आहे. दैव त्या माणसावर आपोआप झडप घालतो. म्हणून जगांत प्रथम शरीर कमविले पाहिजे व तद्नंतर ते उत्तम रीतीने सांभाळले पाहिजे.’ त्यांच्यादृष्टिने शरीर उत्तम सांभाळणे हाच खरा धर्म आहे. याहीपुढे ते श्रमप्रतिष्ठेला किती महत्त्व देत याबाबत त्यांचा मुलगा विवेक यांनी एक आठवण सांगितली आहे. दत्तोबा आपल्या महाविद्यालयात शिक्षण घेत असताना सुट्टीत गावाकडे आल्यावर जनावरे राखायला पाठवत असत. ‘कॉलेजला शिकतो आणि गुरे राखतो,’ यावर गावकरी टोमणे मारत. मुले नाराज झाली. यावर दत्तोबांनी त्यांना सांगितले, ‘त्यांच्याकडे लक्ष देऊ नको. जे नावं ठेवतील त्यांना कामाचे महत्त्व कळत नाही मग त्यांची कुणाला चिंता? जे चांगले म्हणतात, ते सोबतीच्या लायकीचे. कामाची पुजा व्हायला पाहीजे. त्यात कमीपणा नाही. कामावरून वर्गीकरण न करता त्याची माणुसकी, विचार-आचार पाहून त्याची योग्यता ओळखावी.’
दत्तोबा आयुष्यात चूकुनही कधी निराश झाले असतील, असे वाटत नाही. एखादा कठीण प्रसंग आला की लोक गर्भगळीत होतात. आपले कसे होणार कुटुंबाचे कसे होणार, हे विचार मनात आणून निराशेच्या गर्तेत जातात. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. मात्र अशा प्रसंगांना ते कधीच डगमगले नाहीत. प्रत्येक अडचणीवर मात करत ते पुढे चालत राहिले. निजामासारखा प्रबळ शत्रू असताना, एकट्या मराठवाड्यात रझवीचे अडीच लाख रझाकार असताना, ते लढले. दत्तोबांवर लाखाचे बक्षीस ठेवले तरी ते डगमगले नाहीत. याचे कारण त्यांच्या एका रोजनिशीतील पानात मिळते, ‘ज्यावेळी माणूस कोशीस करून थकतो तेव्हा त्याचा प्रयत्न सफल होणार, हे खास. अत्यंत उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, अत्यंत हिवाळा होऊ लागला की उन्हाळा जवळ आला समजावे. अमावास्येच्या काळ्याकुट्ट अंधारातच विजेची कोर दिसते.’ कितीही संकट आले तरी अंतिम यश प्रामाणिक प्रयत्न करणारासच मिळते, असा त्यांना विश्वास होता.
असे हे दत्तोबा ऊर्फ दत्तात्र्यय इश्वरराव भोसले! छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा निजामाशी लढताना वापरत राहिले. निजामाच्या ताब्यातून मराठवाडा स्वतंत्र झाल्यावर राजकारणाची वाट चोखाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पुन्हापुन्हा तोच प्रयत्न करण्यापेक्षा समाजसुधारणा, आरोग्य आणि शिक्षणावर लक्ष करून जीवन जगत राहिले. समाजाला विवेकवादाची, तारतम्याची शिकवण देत राहिले. त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात गाजवलेल्या शौर्य आणि पराक्रमाची अजूनही म्हणावी तशी नोंद घेण्यात आली नाही. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षांत त्यांच्या कार्यावर संशोधन होणे आणि त्यांचे कर्तृत्व आणि विचार समाजासमोर आणणे काळाची गरज आहे. त्याची समाजाला आज गरज आहे. तोच त्यांच्या कार्याचा खरा गौरव होईल.